मुंबई - मुंबईमध्ये वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रात्री जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही 31 डिसेंबरला नवे वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडण्याची शक्यता असल्याने गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिसांसह पालिकेची पथके तैनात केली जाणार आहे. कोरोना नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.
पार्ट्यांवर बंदी -
मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या असून त्या थोपवण्यात पालिका आणि सरकारला यश आले आहे. नोव्हेंबर पर्यंत मुंबईमधील कोरोना काही प्रमाणात आटोक्यात होता. मात्र, जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार होत आहे. भारतातही या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. तर, पालिकेने मुंबईत कोणत्याही पार्ट्या आणि त्यासाठी एकत्र येण्यास बंदी घातली आहे.
तर कारवाई होणार -
गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, चौपाट्या, गार्डन आदी ठिकाणी मुंबईकर 31 डिसेंबरला एकत्र येण्याची शक्यता आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्र आल्यास कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रसार होण्याची भीती आहे, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मात्र, त्याचसोबत पालिकेचे कर्मचारीही गर्दीच्या ठिकाणी उपास्थित राहून कोरोना नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
हॉटेलमध्येही होणार तपासणी -
31 डिसेंबरच्या रात्री नव वर्षाच्या पार्ट्या होण्याची शक्यता आहे. तसेच, हॉटेल आणि इतर ठिकाणी 50 टक्के उपास्थितीचा नियम पायदळी तुडवला जाण्याची शक्यता आहे. यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभागात 2 असे 24 विभागांत 48 पथके तयार करण्यात आली आहे. ही पथके रात्री हॉटेल आणि इतर ठिकाणी जाऊन तपासणी करणार आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा - Nana Patole On Governer : राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा : नाना पटोले