नवी दिल्ली - गुजरातमधील द्वारकेत सापडलेले ड्रग्ज (Gujrat Drug Case) ही चिंतेची बाब आहे. त्याबाबत सखोल चौकशी होऊन कारवाई व्हायला हवी. तसेच, एक ग्रॅम, दीड ग्रॅम ड्रग्ज पकडून जागतिक दर्जाची ख्याती मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांनी या 350 किलो ड्रग्जचा तपास करावा, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी नाव नघेता एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांना लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
त्यांना बर्नाड शॉ वाचायला उशिर झाला
खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. 'चिखलात लोळायचा कार्यक्रम वक्तशीर झाला, यांना बर्नाड शॉ वाचायला उशिर झाला' या रामदास फुटाणे यांच्या ओळी त्यांनी ट्विट करत टीका केली आहे. या बरोबरच शॉ हे मोठे साहित्यिक-नाटककार होते. आता राजकारणी लोक त्यांना वाचायला लागले आहेत, हे चांगली गोष्ट आहे. असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्या राजकीय नेत्यांच्या हातचे बाहूले बनू नये
राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागण्यांसोबतच इतरही मागण्या त्यांनी लावून धरलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील एसटी वाहतूक सध्या बंद आहे. या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनीही कामगारांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्या राजकीय नेत्यांच्या हातचे बाहूले बनू नये, असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले आहे.
कुटुंबाचे, राज्याचे आणि एसटीचे हित पाहावे
महाराष्ट्र सरकारने, माझ्या माहितीप्रमाणे कामगारांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहेत. कामगारांनी स्वतःचे, कुटुंबाचे, राज्याचे आणि एसटीचे हित पाहावे, असे आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे त्याला आपण प्रतिसाद द्यावा असही राऊत म्हणाले आहेत.
कामगारांच्या चुली पेटाव्यात, कामगारांचे प्रश्न सुटावेत असे वाटत नाही
अनिल परबांचा पुतळा जाळण्यामागे राजकारण आहे. हे पुतळे जाळण्याचे राजकारण करणारे कोण आहेत, यांचा राजकीय अजेंडा काय आहे, त्यांना कामगारांच्या मागण्यांपेक्षा, एसटीच्या संपापेक्षा, कामगारांच्या प्रश्नांपेक्षा महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे सरकार बदनाम करण्यातच जास्त रस दिसतोय. त्यांना कामगारांच्या चुली पेटाव्यात, कामगारांचे प्रश्न सुटावेत असे वाटत नाही असही राऊत विरोधकांवर टीका करताना म्हणाले आहेत.
हेही वाचा - नवाब मलिक यांच्या जावयाची देवेंद्र फडणवीसांना मानहानीची नोटीस