मुंबई - मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गवर धावणाऱ्या एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्यांची कपात केल्यानंतर आजपासून सुधारित तिकीट दर लागू झाले आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज दुपारपर्यत ५ हजार पेक्षा जास्त प्रवाशांची एसी लोकलमधून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.
पहिल्याच दिवशी एसी लोकलला प्रतिसाद - पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलचे तिकीट भाडे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने या एसी लोकल प्रवाशांनी पाठ फिरवली होती. या एसी लोकलचे तिकिट काढणे प्रवाशांना परवडत नव्हेत.त्यामुळे एसी लोकलचे तिकिट दर कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. याची दाखल घेऊन उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्यांची कपात केल्यानंतर आजपासून सुधारित तिकीट दर लागू झाले आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दहा हजार पल्ला गाठण्याची शक्यता- रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी २ वाजेपर्यत मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलचे दोन हजार ३०८ तिकीट विक्री झाली असून २ हजार ५०० प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या एसी लोकलचे २ हजार ४४९ तिकीट विक्री झाली असून २ हजार ६८१ प्रवाशांनी प्रवास केला आहे. रात्रीच्या शेवटचा लोकलपर्यत एसी लोकलची प्रवासी संख्या दहा हजारांचा घरात पोहचण्याची शक्यता असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.