मुंबई - मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेकडून कोरोना अँटिजेन चाचण्या आणि लसीकरण केले जात आहे. त्याचाच एका भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी दादर फुल मंडईत चाचण्या केल्या असता ६ हमाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज दादर मार्केटमध्ये कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यात पुन्हा ६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात नागरिक आणि फेरीवाल्यांचा समावेश असल्याची माहिती पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. यामुळे दादर मार्केट कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा जामीन एनआयए कोर्टाने फेटाळला
कोरोना चाचण्या -
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी होत असताना लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन टप्प्या-टप्प्याने सर्व व्यवहार सुरु करण्यात आले. यामुळे सर्वत्र गर्दी होऊ लागल्याने रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांच्या रोज संपर्कात येणारे भाजीवाले, फेरीवाले, दूधवाला, सुरक्षा रक्षक आदी सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा चाचण्या केल्याने वेळीच रुग्ण आढळून आल्यास इतरांना होणारा संसर्ग रोखता येणे शक्य होणार आहे. यासाठी महापालिकेने अँटिजेन चाचण्या कारण्यावर भर दिला आहे.
दादर मार्केटमधील ६ जण पॉझिटिव्ह -
मुंबईमधील मार्केटमधील अनेक मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली असते. मार्केटमध्ये गर्दी होत असल्याने पालिकेने दादर पश्चिम येथील मार्केट तात्पुरते बांद्रा बीकेसी आणि चुनाभट्टी येथील सोमय्या उद्यान येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केट तात्पुरते हलवण्याचा निर्णय घेतला तरी त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे दादरमधील मार्केटमध्ये सध्या तरी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी उसळत आहे. या गर्दीमुळे कोरोना पसरण्याची भीती असल्याने पालिकेने मार्केटमधील विनामास्क घालणाऱ्या ६८ लोकांची आणि फेरीवाल्यांची कोरोना चाचणी केली. त्यात ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत., या सर्वांना जवळच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती दिघावकर यांनी दिली.
६ हमाल पॉझिटिव्ह -
या आधी २० मार्चला दादर पश्चिम येथे असलेल्या माॅ मिनाताई ठाकरे फुल मंडईत पालिकेच्या जी उत्तर विभागामार्फत दुकानदार, कामगार, हमाल आदींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात एकाही दुकान मालकाला कोरोना झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र मंडईत हमाली करणारे ६ हमाल, कामगार कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. त्याना पुढील उपचाराकरीता वनिता समाज हाल शिवाजी पार्क येथे दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा- परमबीर सिंग यांच्यावर लावलेल्या आरोपांवर ठाम - पोलीस निरीक्षक अनुप डांगे