मुंबई : परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या 12 मीटर लांबीच्या आणि 36 आसन असलेल्या टुरिस्ट बसला केंद्र शासनाने मोठा दणका दिला आहे. महाराष्ट्र शासनाने या बसेसवर आक्षेप घेतल्यानंतर केंद्राने यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्राच्या नव्या आदेशानुसार 12 मीटर लांब बसेसमधून आता 36 स्लिपर आसन क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही. याउलट 36 आसनी स्लीपरसाठी आता 13.5 मीटर लांब बस खरेदी करावी लागणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे आदेश
राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेसना ३६ आसने अर्थात स्लीपर सीटची परवानगी देण्यासंदर्भातील आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे संचालक डॉ. पीयूष जैन यांनी जारी केले आहे. सर्व राज्यांतील परिवहन विभागांना पाठविलेल्या पत्रात जैन यांनी २६ जून २०२० नंतर तयार केलेल्या १३.५ मीटर लांब बसेसना ३६ बर्थची परवानगी दिली आहे. याउलट १२ मीटर लांब बसेसना परवानगी देणाऱ्या राज्यांनी मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचे सूचित केले आहे.
परवानगी रद्द होणार
या आदेशांबाबत राज्याच्या परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुजरातसह काही राज्यांमधील शासनांनी १२ मीटर लांब बसेसना ३६ बर्थसाठी परवानगी दिलेली आहे. याउलट महाराष्ट्रात १२ मीटर लांब बसेसमधून ३६ बर्थ वाहतुकीस परवानगी नाही. तशी हरकत राज्य शासनाने केंद्राला पाठवली होती. त्याची दखल घेत केंद्राने या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच राज्य शासनाकडून इतर राज्यांनाही नोटीस पाठवून १२ मीटर लांब बसेसमध्ये ३६ बर्थना दिलेली परवानगी रद्द करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.
आदेशाचे स्वागत केले
मुंबई बस मालक संघटनेनेही या आदेशाचे स्वागत केले आहे. संघटनेने सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून बाहेरील राज्यांतील बसेस अनधिकृतपणे ३६ बर्थच्या बसेसमधून प्रवासी वाहतूक करत होत्या. राज्यात ३० बर्थना परवानगी असल्याने त्यांच्या तुलनेत येथील बस मालक स्पर्धेत मागे पडत होते. आता शासनाने १२ मीटर लांब बसेसना ३० बर्थ, तर १३.५ मीटर लांब बसेसना ३६ बर्थची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तरी राज्यात १२ मीटर लांब बसेसमध्ये ३६ बर्थ वाहतूक करणाऱ्या बसेसवर जप्तीची कारवाई करण्याची संघटनेने केली आहे.