मुंबई - कोहिनुर मिल संदर्भात गुरुवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील बलार्ड पियर येथील ईडी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. त्यादरम्यान मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांना कलम 149 च्या अंतर्गत नोटीस बजाविण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या वतीने मनसे कार्यरत व पदाधिकारी यांना प्रतिबंधक नोटीस बजावण्यात येत आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्यात नाराजीचे सूर उमटत आहे. ईडीकडून चौकशीसाठी नोटीस आल्याने 22 ऑगस्ट रोजी मुंबई व ठाण्यात बंद करून आंदोलन करण्याचा स्थितीत मनसे कार्यकर्ते होते. मात्र स्वतः राज ठाकरे यांनी 22 ऑगस्ट रोजी कुठलेही आंदोलन किंवा बंद न करण्याचे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र मनसे कार्यकर्त्यांना दादर पोलिसांकडून कलम 149 च्या अंतर्गत नोटीस धाडण्यात आली आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने बजावलेल्या नोटीसीनंतर प्रवीण चौगुले या ठाण्यातील तरुणाने आत्मदहन केल्याने एकच खळबळ माजली होती. त्यानंतर सांताक्रूझ गोळीबार येथे राहणारा 29 वर्षीय तरुण गणेश मस्के यांनी पोलिसांना फोन करून आत्मदहन करण्याचा इशारा दिला. या फोननंतर शिवाजी पार्क व दादर पोलीस अलर्ट झाले. तसेच पोलिसांनी कृष्णकुंज परिसरात मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.