मुंबई - महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले असतील तर ती चांगली गोष्ट आहे. राज्याने जर केंद्राशी समन्वय ठेवला तर राज्याचा फायदा होतो. उठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं हे चांगलं नाही. आज ते पंतप्रधानांना भेटले ही चांगली गोष्ट आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत असताना आम्हालाही सोबत नेलं असतं तर आनंदच झाला असता, अशी प्रतिक्रियाही फडणवीस यांनी दिली आहे.
मोदी-ठाकरे यांच्यात दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर आता राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला भाजपचे राज्यातील सर्व बडे नेते उपस्थित होते.
- 'मोदी-ठाकरे यांच्यात व्यक्तिक भेट झाल्यास आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही'
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची वैयक्तिक भेट घेतली की नाही याबाबत मला माहिती नाही. पण मी जेव्हा डेलिगेशन घेऊन जायचो तेव्हा 5 ते 10 मिनिटे ते डेलिगेशनशी चर्चा करतात आणि मग मुख्यमंत्र्यांशी 5 ते 10 मिनिटे वेगळी चर्चा करतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि ठाकरे यांची वेगळी भेट झाली असेल तर त्याचे आश्चर्य वाटण्यासारखं काही नसल्याचं फडणवीस म्हणाले.
- मोदी-ठाकरे भेट -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज राजधानी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीला मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्येही बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.
- ‘समन्वय साधला तर राज्याचा फायदा’
अशा प्रकारच्या बैठकीतून केंद्र आणि राज्यात समन्वय साधला जातो. निवडणूक काळात राजकारण होत असतं पण इतर वेळी समन्वय साधला तर राज्याचा फायदा होतो. महाराष्ट्र नेहमीच केंद्र सरकारच्या अजेंड्यावर राहिलाय. जे काही भूमिका आहे ती योग्य ठेवली तर त्याच राज्याचा फायदा होत असतो, असंही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - नवनीत राणांची खासदारकी धोक्यात, जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने केले रद्द