मुंबई - राज्यात लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्यात यावे, यासाठी राज्य सरकारकडून ग्लोबल टेंडर काढण्यात आली. मात्र या ग्लोबल टेंडरला अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले. आज राज्यातील कोरोना परिस्थितीचा आणि म्युकर मायकोसिसचा राज्यातील परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे सह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील करोना परिस्थितीबाबत माहिती दिली. राज्याचा रिकव्हरी रेट हा 93 टक्क्यांच्या वर गेल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तर तिथेच राज्यातील मृत्यूदर हा 1.5% असून पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांवर आला आहे.
हे ही वाचा - धक्कादायक! गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना मृतदेहांची अदलाबदल
राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, मात्र नियमांमध्ये शिथिलता आणणार -
एक जूनपर्यंत राज्य सरकारने घोषित केलेला लॉकडाऊन संपणार आहे. मात्र गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा लॉकडाउन वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मात्र राज्याची कमी होणारी रुग्ण संख्या पाहता काही नियमांमध्ये शिथिलता आणली जाऊ शकते, असे देखील यावेळी राजेश टोपे यांनी शक्यता वर्तवली आहे. मात्र यासोबतच राज्यामध्ये 18 जिल्ह्यात अजूनही रुग्णांची वाढ होते आहे. त्या जिल्ह्यांमध्ये नियम शिथील केले जाणार नसल्याचेही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच मुंबई लोकल संदर्भात अद्याप कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचेही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले आहे.