मुंबई - गेले ५६ वर्षे शिवसेनेच्या दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होत आहे. यंदा शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही गटाने पालिकेकडे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्यासाठी परवानगीबाबत अर्ज केला आहे. याबाबत विधी विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाने दिली होती. मात्र आता असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे विधी विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे पालिका प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत.
दसरा मेळावा वाद - दादर शिवाजी पार्क येथे गेले ५६ वर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असे. बाळासाहेबांच्या निधनानंतरही शिवसेनेचा दसरा मेळावा ठरल्याप्रमाणे होत आहे. २०१२ नंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यापूर्वी मेळाव्यासाठी परवानगीसाठीचा अडथळा कधीही समोर आलेला नाही किंवा त्याची चर्चाही झालेली नाही. यावेळी मात्र राजकीय समिकरण बदलले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर राजकीय चित्र बदलून गेले आहे. फुटलेला शिंदे गट आपण शिवसेनाच असल्याचा दावा करीत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून परवानगीसाठी अर्ज केल्यावर शिंदे गटात सामिल झालेले स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे केला आहे. २२ ऑगस्टला शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी उद्धव ठाकरे गटाकडून तर ३० ऑगस्ट रोजी सदा सरवणकर यांनी शिंदे गटाकडून अर्ज केला आहे. या दोन्ही अर्जावर अद्याप पालिकेने निर्णय घेतलेला नाही. पालिकेने कोणालाही परवानगी दिली तर दुसरा पक्ष कोर्टात जाणार असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढणार आहे. तसेच राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे.
अद्याप कोणताही निर्णय नाही - दसरा मेळावासाठी शिवाजी पार्कवर परवानगी कुणाला हा पेच पालिकासमोर आहे. गणेशोत्सवानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असे पालिकेने म्हटले होते. पालिकेच्या जी उत्तर विभागाकडे उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही गटांनी केलेल्या अर्जावर विधी विभागाचा अभिप्राय मागवण्यात आला आहे असे सांगण्यात आले होते. याबाबत पालिकेच्या विधी विभागाकडे संपर्क साधला असता दसरा मेळाव्याला परवानगी द्यावी की नाही असा कुठला प्रस्ताव आलाच नसल्याचे स्पष्ट केले आहे. विधी विभागाने दिलेल्या माहिती बाबत जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी भाष्य करणे सपकाळे यांनी टाळले असून अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.