मुंबई - "ट्रॉम्बे परिसरातील चिता कॅम्प येथील कब्रस्तानच्या नूतनीकरणाच्या कामावरून काही नेत्यांनी सुरू केलेले श्रेयवादाचे राजकारण निंदनीय असून, निदान या मुद्द्यावर तरी राजकारण करू नये", असे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कब्रस्तानच्या नूतनिकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी खासदार राहुल शेवाळे उपस्थितीत होते.
2017 मध्ये तयार केला होता नूतनिकरणाचा आराखडा
गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक जनतेकडून मुंबईच्या पूर्व उपनगरातील ट्रॉम्बे परिसरातील कब्रस्तानच्या नूतनिकरणाची मागणी केली जात आहे. पालिकेच्या वतीने 2017 मध्ये या नूतनिकरणासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, याठिकाणी शासनाच्या वतीने कारशेड चे काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने, या नूतनिकरणाच्या कामाला गती मिळाली नाही. शिवसेनेचे स्थानिक खासदार आणि स्थानिक नगरसेविका यांच्या माध्यमातून यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यामुळे अखेर पालिकेच्या वतीने कब्रस्तान आणि शेजारील ख्रिशन स्मशानभूमीच्या नूतनिकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
साडे सहा कोटी रुपयांचा खर्च
सुमारे साडे सहा कोटी रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या, या नूतनिकरणाच्या कामामध्ये कब्रस्तान आणि ख्रिश्चन स्मशानभूमी येथे आरसीसी कंपाऊंड वॉल, पेव्हर ब्लॉक, शेड, कार्यालय, प्रार्थनेची जागा यांचा समावेश असणार आहे.
हेही वाचा - यास चक्रीवादळ : कोलकाता मेदिनीपूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा