मुंबई - राज्यात रेमिडेसिवीरवरुन राजकीय वाद पेटला आहे. भाजपने दमणच्या कंपनीतून परस्पर रेमिडेसिवीर मिळवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सत्ताधारी करत आहेत. यावर आता अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी भाष्य करताना, रेमिडेसिवीर हे औषध कोणताही राजकीय पक्ष ताब्यात घेऊ शकत नाही. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाची नियमावली असल्याचे सांगत भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
काय आहे रेमिडेसिवीर राजकारण?
दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीकडून 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन ताब्यात घेण्याचा भाजप नेते प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी प्रयत्न केला होता. ही इंजेक्शन लोकांसाठी वापरण्याचा हेतू असल्याचे या नेत्यांनी सांगितले आहे. त्याउलट भाजपच्या नेत्यांनी नियमांचा भंग करुन साठेबाज कंपनीकडून ही औषधे घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी ब्रुक्स या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी बोलावले होते. डोकानिया यांची चौकशी सुरु असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर थेट पोलीस ठाण्यात पोहचले होते. यानंतर या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनीही हे प्रकरण गंभीर असून विरोधी पक्षाने यात हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कायदेशीररित्या भाजपने ब्रुक्स कंपनीकडून रेमेडिसिव्हीर मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी नेत्यांकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
सात कंपन्याकडून 35 ते 50 हजार रेमिडेसिवीरचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे. परंतु, सध्या 38 हजार मिळत आहेत. संबंधित कंपनीने 21 तारखेनंतर 70 हजार रेमिडेसिवीर देऊ, असे आश्वासन दिले आहे. राज्यात १५ ते २० टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. शासनाच्या नियमावलीनुसार तपासणी करुन ऑक्सिजन आणि रेमिडेसिवीर पुरवठा केला जाणार आहे. बारा ते साडेबाराशे मेट्रीक टन ऑक्सिजन साठा आहे. कर्नाटक, बंगलोर आदी दोन राज्यात 1,550 मेट्रीक ऑक्सिजन साठा आहे. 1450 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. परंतु, अधिक रुग्ण वाढल्यास अडचणी निर्माण होऊ शकतील, असा इशारा शिंगणे यांनी दिला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्याबाहेरुन 50 हजार मेट्रीक टन ऑक्सिजन आणण्याची तयारी सुरु केली आहे.