मुंबई - राज्यातील शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्षात मध्यस्थीसाठी नितीन गडकरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार बनेल, मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यात अडीच वर्षे मुख्यमंत्री पद याबाबतीत काहीही ठरले नव्हते, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... काँग्रेसच्या आमदारांना २५ ते ५० कोटींची ऑफर, विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट
अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चिघळत चालला असल्याने सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी युतीत अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत काहीही ठरलं नसल्याचे सांगत शिवसेनेला डिवचले आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात 13 व्या विधानसभेची मुदत आज शुक्रवारी संपत असून राजधानी मुंबईत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होत असून या बैठकीला गडकरी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा... मी फोनची वाट बघतोय, कुणी फोन करतच नाही - जितेंद्र आव्हाड
'राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात येईल. गरज पडल्यास मध्यस्थी करायला तयार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यात सरकार बनेल', असे गडकरी यांनी सांगितले. दरम्यान गडकरी यांच्या अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्याने शिवसेना आणि भाजपमधील बेबनाव अधिकच वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर वर्षावर होत असलेल्या बैठकीत निर्णय झाल्यास, गरज पडल्यास गडकरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.