मुंबई - काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ( cm uddhav thackeray on kashmiri pandit ) होती. त्यावरुन आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता आहे. मात्र, हिंदूंना राज्यात रजा अकादमी आणि पीएफआय सारख्या संघटनांकडून नेहमीच लक्ष केले जाते त्याचे काय?, अशी टीका राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केली ( nitesh rane criticized cm uddhav thackeray ) आहे.
नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, हिंदूंना राज्यात रजा अकादमी आणि पीएफआय सारख्या संघटनांकडून नेहमीच लक्ष केले जाते त्याचे काय?,. काश्मीर पंतप्रधान मोदींच्या हातात सुरक्षित आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका, असा खोचक टोला राणेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या ट्विटनंतर पुन्हा काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापताना दिसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून 'कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे टार्गेट किलिंग' काश्मीर खोऱ्यात सुरू आहे. मागील काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांची हत्या सुरु आहे. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यानी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.
मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले? - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले की, काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करेल. गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडित आणि हिंदूंना टार्गेट करणे काश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात 9 काश्मीर पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत काश्मीर पंडिताचे पालायन सुरु आहे. अवघ्या देशात याबाबत तीव्र संताप व्यक्त होत होतोय. काश्मिरी पंडितांना घरवापसीची स्वप्न दाखवली गेली. पण, घरवापसी तर दूरच, उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणात पलायन सुरू झाले. ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना असल्याचं, मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितले आहे.