मुंबई - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवीस यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले होते. मलिक यांनी अडरवर्ल्डशी संबंध असलेल्या गुन्हेगारांसोबत जमीन व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे आरोप मलिक यांनी फेटाळून लावले आहेत, मात्र भाजपच्या मंत्र्यांकडून त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल जाब विचारला जात आहे. या मुद्द्याची आता भाजप नेते नितेश राणे यांनी देखील दखल घेतली असून त्यांनी मलिकांचे नाव न घेता त्यांच्यावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे 93 दंगलीच्या आरोपींशी संबंध असलेल्या मंत्र्यासोबत सत्ता उपभोगत असल्याची खोचक टीका नितेश राणे यांनी ट्विटरवरून केली आहे.
हेही वाचा - 'अविध्न' आग प्रकरणी मालक व भाडेकरुंना नोटीस, गुन्हाही दाखल
93 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवले. आता त्यांचाच मुलगा 93 दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगत आहेत. खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले. मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या व्यक्तींसोबत जमीनीचे व्यवहार केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडविले, जे मुंबईचे मारेकरी आहेत, त्यांच्याशी मंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध कसे? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला होता. सरदार शहा वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल या दोघांशी केलेले आर्थिक व्यवहार आणि त्यांच्याकडून कोट्यावधींची जमीन कवडीमोल भावात कशी खरेदी केली? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
कोण आहेत सरदार शहा वली खान व सलीम पटेल?
सरदार शहा वली खान हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली आणि ती सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. सध्या तो कारागृहात आहे. टायगर मेमनच्या नेतृत्त्वात फायर आर्म ट्रेनिंगमध्ये हा सहभागी झाला होता. मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीत बॉम्ब कुठे ठेवायचा, याचा सर्वे त्याने केला होता. टायगर मेमनच्या घरी बॉम्बस्फोटाचे कारस्थान शिजले. त्या सर्व मीटिंगला हा उपस्थित होता. त्याला काय होणार आहे, याची संपूर्ण माहिती होती. अल हुसैनी बिल्डींग माहीममध्ये टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स याने भरले. माफीचे साक्षीदार आणि इतर गुन्हेगारांनी याबाबत प्रत्यक्षदर्शी पुरावा दिला, त्यामुळे त्याला जन्मठेप झाली. दुसरी व्यक्ती ही मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल ही आहे. तो हसीना पारकरचा सहकारी आणि फ्रंटमॅन होता. तिच्यासोबत त्याला 2007 मध्ये पकडण्यात आले होते. त्याला समोर करून संपत्ती बळकाविण्याचे काम ती करायची. या दोघांकडून नवाब मलिक यांच्या कंपनीने जागा खरेदी केली आहे, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले होते.
मंत्री नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण
"माझा कोणत्याही आरोपीशी संबंध नाही. कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडची जवळपास तीन एकर जागा ही माझ्या मालकीची नाही. या कंपनीमध्ये असलेल्या सहा दुकानांची मालकी माझ्याकडे असून ही मालमत्ता खरेदी करताना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यावेळी असलेल्या बाजारभावानुसार ही मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना काही शंका असल्यास रजिस्ट्रार ऑफिसमध्ये याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत", असे म्हणत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले.
पूर्वीपासूनच गोवावाला कंपाउंड या परिसरामध्ये असलेली चार दुकाने आपण भाडेतत्त्वावर घेतली होती. या जागेचे मूळ मालक मुनीरा प्लंबर यांच्याकडून या चारही दुकानांचे मालकी हक्क आणि खरेदी केली. त्यानंतर अजून दोन दुकाने याच परिसरात आम्ही खरेदी केली. ती खरेदी करत असताना बाजार भाव आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही मालमत्ता खरेदी करण्यात आली. तसेच याच परिसरामध्ये रखवालदार म्हणून काम करणारे सरदार खान यांनी तीनशे स्क्वेअर फुट जागा ही आपल्या नावावर केली होती. ही जागा खरेदी करायची असल्यास मूळ मालकाने आपल्याला सरदार खान यांच्यासोबत व्यवहार करायला सांगितला होता. तो व्यवहार आपण कायदेशीररित्या केला. सरदार खान हे शहा वली खान यांचे वडील असून बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात शहा वली खान आरोपी आहेत, हे सर्व जगाला ठाऊक आहे. मात्र, त्या मालमत्तेचा कोणताही वाद नव्हता किंवा त्या मालमत्तेसंबंधी खरेदी - विक्रीबाबत कोणताही अडथळा नव्हता. त्यामुळे, कायदेशीररीत्या तीनशे स्क्वेअर फुट जागेचा व्यवहार करण्यात आला. मात्र, देवेंद्र फडणवीस करत असलेले आरोप हे पूर्णपणे खोटे असून याबाबत आपण पुरावे सादर करू, असे मंत्री नवाब मलिक म्हणाले होते.
हेही वाचा - ST workers strike : एसटी कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करणार; उद्या होणार निर्णय -