मुंबई - मुंबईसह राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेच्या हद्दीत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईमधील नाईट कर्फ्यू हटवण्यात यावा असा प्रस्ताव मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला असून आज मंगळवारी हा कर्फ्यू हटवण्याची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे ५१६ नवे रुग्ण, आज सर्वात कमी मृतांची नोंद
मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असतानाच ब्रिटन शहरात कोरोनाचा नवीन प्रकार समोर आला. पालिकेने यानंतर मुंबईत रात्रभर २३ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला. या नाईट कर्फ्यू दरम्यान ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली होती. मुंबईत नाईट कर्फ्यू लावल्याने त्याचे संमिश्र पडसाद उमटले होते. नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमासाठी रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल उघडे ठेवण्याची परवानगी हॉटेल व्यासायिकांनी मागितली होती. तशी परवानगी पालिकेला द्यावी लागली होती.
आज कर्फ्यू रद्द करणार -
मुंबईत कोरोना आटोक्यात येत असताना पब, नाईट क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. मात्र पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक झाली. या बैठकीत आता हा कर्फ्यू हटवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला असून राज्य सरकार आज मंगळवारी त्याची घोषणा केली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. नाईट कर्फ्यू हटवला तरी पालिकेच्या नियमांचे मुंबईकरानी पालन करणे गरजेचे आहे, असे काकाणी म्हणाले.