मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे मुंबई आणि परिसरात आज ५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामधील एक मुंबईमधील, दोन कल्याण आणि दोन नवी मुंबईमधील आहेत. हे सर्व रुग्ण या आधीच्या रुग्णांच्या जवळचे नातेवाईक आहेत. मुंबई आणि मुंबई परिसरात रविवारपर्यंत कोरोनाचे ९ रुग्ण होते. आज नव्याने ५ रुग्ण सापडल्याने मुंबई आणि मुंबई परिसरातील रुग्णांची संख्या १४ झाली आहे, अशी माहिती पालिकेच्या उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.
मुंबईमध्ये आज एका ४४ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेने लिस्बन, पोर्तुगाल या देशात प्रवास केला होता. १३ मार्चला ही महिला भारतात परतली होती. तिच्यासह तिच्या जवळच्या आणखी एका व्यक्तीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी कल्याण येथील एक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला होता. त्याची ३३ वर्षी पत्नी आणि ३ वर्षाच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या जवळच्या नातेवाईकांचा शोध घेण्याच्या सूचना ठाणे जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई येथीलही एक रुग्ण दोन दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याने कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या जवळच्या दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये एकाचे वय ४७ तर दुसऱ्याचे वय ४२ आहे. या लोकांनाही फिलिपिन्स येथे प्रवास केला होता. २ मार्चला ते भारतात मुंबई येथे परतले होते. मुंबई विमानतळावर १८ जानेवारीपासून २ लाख ४६ हजार ८४३ प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यात आली आहे. त्यापैकी केंद्र सरकारच्या नियमानुसार आतापर्यंत ४९८ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ४५२ लोकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. ४३३ रुग्णांना आतापर्यंत कस्तुरबा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ६५ रुग्ण आजही कस्तुरबा रुग्णालयात ऍडमिट आहेत. कस्तुरबा रुग्णालयात आजपर्यंत १८६५ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. आजच्या दिवसात २० चाचण्या करण्यात आल्या, त्यासर्व निगेटिव्ह आल्या आहेत. अद्यापही २४ चाचण्यांचा रिपोर्ट यायचा बाकी आहे असे, शाह यांनी सांगितले.
रिस्क प्रोफाइल कमिटीची स्थापना -
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने रिक्स प्रोफाइल कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीच्या सल्ल्यानुसार विमानतळावर आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्याची अती धोकादायक, मध्यम धोकादायक आणि कमी धोकादायक अशा तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. जे रुग्ण बाहेरच्या देशातून आले आहेत आणि त्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्याना अति धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. जे लोक बाहेरच्या देशातून आले आहेत आणि त्यांच्या सहवासात आले आहे, त्यांच्या जवळच्या गर्भवती महिला, वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुले यांना मध्यम धोकादायक म्हणून गोषी करण्यात आले आहे. तर जे बाहेरच्या देशातून आलेल्या प्रवाशांच्या सानिध्यात आलेले लांबचे लोक आहेत त्यांना कमी धोकादायक म्हणून गोषी करण्यात आले आहे. मध्यम धोकादायक असलेले ११ रुग्ण सध्या मुंबईच्या मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर कमी धोकादायक असलेल्या रुग्णांनी घरातच १४ दिवस राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सेव्हन हिल रुग्णालयात २४ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. ते तीन पाल्यात काम करणारा आहेत असे दक्षा शाह यांनी सांगितले. मुंबई आणि मुंबई परिसरात एकूण - १४ रुग्ण असून यात मुंबई - ६, कल्याण - ३, नवी मुंबई - ३, ठाणे - १, रायगड - १, अशी रुग्णांची संख्या आहे.
हेही वाचा -
'आधार-पॅन' जोडणीची अंतिम मुदत चुकवू नका- प्राप्तिकर विभाग
Corona Effect VIDEO: संत्र्यांच्या मागणीतील वाढ व्यापाऱ्यांच्या पथ्यावर?