मुंबई - राज्यात कोरोनाचे आज 525 तर ( Today Corona Patient In Maharashtra ) ओमायक्रॉन संसर्गाची 206 जणांना ( Today Omicron Patient In Maharashtra ) बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकीकडे कोरोना आटोक्यात येत असताना गेल्या काही दिवसांपासून ओमयक्रॉनचे रुग्ण अचानक वाढू लागल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, मृत्यूदर घटला असून दिवसभरात कोरोनामुळे 9 जण दगावले आहेत. असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले.
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढउतार होताना दिसून येत आहे. नवीन विषाणू असलेल्या ओमयक्रोन बाधितांची संख्या देखील वाढू लागली आहे. आज 206 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील तीन दिवसांपासून ओमायक्रोनचे रुग्णांची भर पडत आहे. मंगळवारी 104 रुग्ण सापडले होते. तर बुधवारी 38, गुरुवारी 234 रुग्ण सापडले होते. आज सापडलेले 206 पुणे मनपा हद्दीतील आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
आजपर्यंत 5 हजार 211 एवढे रुग्ण आहेत. त्यापैकी 4629 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 9382 जणांची जनुकीय चाचणी केली. 8944 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून 438 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख कमी - अधिक होताना दिसून येत आहे. गुरुवारी 467 संसर्ग बाधितांची नोंद झाली होती. आज 58 रुग्णांची यात भर पडली आहे. मृत्यूचे प्रमाण 1.82 टक्के इतके असून आज 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 992 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.7 टक्के आहे. आजपर्यंत बरे होऊन घरी परतणारे 77 लाख 15 हजार 711 इतके आहेत.
कोविडचे निदानासाठी 7 कोटी 81 लाख 38 हजार 182 चाचण्या आजपर्यंत केल्या. त्यापैकी 10.7 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 67 हजार 916 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 28 हजार 287 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 959 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 4 हजार 476 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.