मुंबई - महानगरात मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले सहा महिने महापालिका कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज रविवारी मुंबईत कोरोनाच्या 2,261 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 4,190 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 2261 नवे रुग्ण आढळून आले असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 38 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 30 पुरुष तर 14 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 98 हजार 720 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 791 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 4190 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 62 हजार 939 वर गेला आहे. सध्या मुंबईत 26 हजार 593 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 66 दिवस तर सरासरी दर 1.05 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 676 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 10 हजार 289 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 10 लाख 82 हजार 329 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.