मुंबई - देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढला आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील एक शिपाई आणि टंकलेखक लिपिकाला कोरोनाची लागण झाली आहे. टाळेबंदी खुली झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने मंत्रालय सुरू करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.
ऊर्जा व कामगार विभागातील एक शिपाई आणि टंकलेखक लिपिकापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विभागातील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात पहिल्यांदा शिपाई कोरोनाबाधीत असल्याचे ८ जुलै रोजी आढळून आले. त्यानंतर याच विभागातील लिपिक टंकलेखक हा कोरोनाबाधीत असल्याची माहिती पुढे आली. यापैकी एकाची प्रकृती खालावल्याने त्यास व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.
मंत्रालयाजवळच असलेल्या विधान भवनातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विधिमंडळात सध्या 16 ते 17 कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. तर 8 ते 9 पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पूर्ण क्षमतेने मंत्रालय चालू करण्याचे संकेत दिले होते. असे असताना मंत्रालयात कोरोनाचा संसर्ग आढळल्याने पुन्हा एकदा सरकारपुढे डोकेदुखी ठरणार आहे. विधिमंडळाचे तीन ऑगस्टपासून अपेक्षित असलेले पावसाळी अधिवेशन होणार की नाही, याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे.
दरम्यान, कोरोनाचे मुंबईत गुरुवारी (दि. 9 जुलै) 1 हजार 282 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 88 हजार 795 वर पोहचला आहे तर मृतांचा आकडा 5 हजार 129 वर पोहचला आहे.