नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी संसदेत विरोधकांवर केलेल्या 'आंदोलनजीवी' या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियातून प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपच्या आंदोलनांचा दाखला देत प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत सुरूवातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत बोलताना आंदोलनजीवी म्हणत विरोधकांवर टीका करताना दिसतात. त्यानंतर भाजपच्या वेगवेगळ्या जुन्या आंदोलनांचे फोटो आणि व्हिडिओ यात टाकण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि किरिट सोमय्या हेही आंदोलनांविषयी बोलताना यात दिसतात. यावर 'ही पाहा, हीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात' असे ट्विटही करण्यात आले आहे.
मोदींनी केली होती 'आंदोलनजीवी' ही टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत बोलताना देशात आंदोलनजीवी ही नवी जमात उदयाला आल्याची टीका विरोधकांवर केली होती. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळावर शेतकरी नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून मोदींनी विरोधकांवर हा निशाणा साधला होता. ही आंदोलनजीवी जमात आंदोलनांशिवाय जगू शकत नाही. जिथे आंदोलन असते तिथे ही लोक जातात अशी टीका मोदींनी केली होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.
हेही वाचा - होय, आम्ही आंदोलनजिवी; संजय राऊतांचे मोदींना प्रत्युत्तर