मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात येणारा जनता दरबार रद्द करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जनता दरबार दोन आठवड्यासाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढणायत आलं आहे. तसेच हे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सध्या राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोरोना झाल्याचेही समोर आले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दक्षता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जनता दरबार दोन आठवड्यासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवार ते गुरुवार भरवण्यात येतो जनता दरबार
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी जनता दरबार घ्यायला सुरुवात केली. मंत्री आणि जनता यांच्यात थेट संवाद व्हावा, तसेच जनतेला मंत्र्यांना भेटून थेट आपले प्रश्न त्यांच्यासमोर मांडता यावे, यासाठी राष्ट्रवादीने जनता दरबाराला सुरुवात केली होती. हा जनता दरबार सोमवार ते गुरुवार होत असून, या जनता दरबारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्याला ठराविक वेळ देण्यात आला आहे. त्या वेळेत जनता दरबार घेतला जातो. या जनता दरबारात सर्वच मंत्र्यांकडे राज्यभरातून सामान्य नागरिक आपले प्रश्न घेऊन येत असतात. मात्र तिथेही सर्वात जास्त गर्दी अजित पवार यांच्याकडे होत असते. प्रत्येक गुरुवारी सकाळी 8 ते 12 यावेळेत अजित पवारांचा जनता दरबार भरतो.