मुंबई - भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात राष्ट्रवादी भवन येथे आज महत्त्वाची बैठक पार पडली. खडसे यांच्या पक्ष प्रवेशावरून मोठी खलबते झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बॅलार्ड पियर येथील मुख्य कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक वरिष्ठ कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसात जोरात सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांना खास जळगाव वरून बोलावण्यात आले होते. त्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांना या बैठकीत सामील करून घेऊन त्यांचे मत या बैठकीत जाणून घेण्यात आले. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर संपूर्ण जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात पक्ष मजबूत होईल, असे मत जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी या बैठकीत व्यक्त केले असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मात्र या बैठकीत खडसे यांचा विषय झाला नसल्याचा दावा केला. खडसे हे भाजपमध्ये नाराज असल्याने त्यांच्या नाराजी संदर्भात भाजपने त्यांचा विचार करावा मात्र आमच्याकडील प्रवेशाचा विषय हा जर तरचा असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
खडसे यांच्या पक्ष प्रवेशाच्या मागील दोन दिवसांपासून हालचाली सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे मंगळवारी जळगाव दौरा अर्धवट सोडून आज मुंबईत झालेल्या या बैठकीला हजर राहिले होते. खडसे यांचा पक्ष प्रवेश राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पक्षबांधणीसाठीही हिताचा ठरणार असल्याने याविषयी जोरदार हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे याच माध्यमातून राष्ट्रवादीने भाजपवर एक मोठे दबावतंत्र सुरू करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.