मुंबई - कांद्याला आता कुठेतरी भाव येत होता. त्याच दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी आणली आणि शेतकऱ्यांवरच एक प्रकारची सर्जिकल स्ट्राइक करुन त्यांची अडवणूक केली, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, की युद्धजन्य परिस्थितीत अनेक वस्तूंवर निर्यात बंदी केले जाते. परंतू, कांद्याचे उत्पादन देशभरात अधिक झालेले असल्याचे लक्षात आल्याने मोदी सरकारने जाणीवपूर्वक कांदा निर्यातबंदी घातली आणि देशातील लाखो शेतकऱ्यांना अडचणीत आणले, असा आरोपही त्यांनी केला. निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव गडगडल्याने देशातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी तातडीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आणि कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली. परंतू, केंद्र सरकारने त्यावर अद्याप निर्णय घेतला नाही. केंद्र सरकारच्या एका चुकीच्या धोरणामुळे आज जेएनपीटीसारख्या बंदरावर जवळपास पाच लाख मेट्रीक टन कांदा सडून पडलाय. याला जबाबदार कोण आहे, असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारने तातडीने कांद्यावरील निर्यातबंदी हटवावी, अशी मागणी त्यांनी केली