मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे. पुण्यातील भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणी बुधवारी मुंबईत चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे मुंबईत दाखल झालेही आहेत. मात्र अस जरी असले तरी एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती मिळत आहे.
अद्याप रिपोर्ट नाही
गेल्या दोन दिवसांपासून खडसे मुंबईतल्या निवासस्थानी आहेत. लक्षणे जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी घरीच थांबणे पसंत केले. खडसेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. जळगावात असताना खडसेंना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली होती. लक्षणे जाणवताच त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रयाण केले. मुंबईतल्या निवासस्थानी सोमवारी आणि मंगळवारी खडसेंनी आराम केला. दोन दिवसांपासून खडसे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, वा कुणाच्याही संपर्कात नाहीत. अशात खडसेंनी कोरोनाची चाचणी केलेली आहे, अद्याप रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती आहे. आज रिपोर्ट येण्याचीही शक्यता आहे. रिपोर्ट येईपर्यंत ईडी चौकशीसमोर हजर होण्यासाठी एकनाथ खडसे यांनी असमर्थता दर्शवली आहे.
आधीही झाली होती लागण
याआधी एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर अगदी काही दिवसांत त्यांना कोरोनाचा धोका पोहोचला होता. 19 ऑक्टोबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पुढच्या काही दिवसांत त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. एकनाथ खडसे सध्या मुंबईत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसेदेखील आहेत. दरम्यान, एक महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे.