मुंबई - राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख ( Ncp Leader Anil Deshmukh ) आणि नवाब मलिक ( Nawab Malik ) यांचा राज्यसभा निवडणुकीला मतदान करण्यासाठीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानिर्णयाविरोधात देशमुख आणि मलिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी ( 10 जून ) तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी 10.30 वाजता यावर निर्णय होणार असून, दिलासा मिळतो की महाविकास आघाडीचे टेन्शन वाढते हे पाहवे लागणार आहे.
शुक्रवारी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज मलिक आणि देशमुख यांच्यावतीने करण्यात आला होता. परंतु, पीएमएलए न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. त्याविरोधात अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली ( Anil Deshmukh Moves Bombay High Court ) आहे. त्यामुळे उद्याच्या मतदानात अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार की नाही यावर तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादीची उच्च न्यायालयात धाव - दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर आता राष्ट्रवादीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीला अवघा एक दिवस बाकी आहे. नवाब मलिक यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये मतदानाच्या परवानगी करिता अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर उद्या सकाळी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे, अशी माहिती नवाब मलिकांचे वकील तारक सय्यद यांनी दिली आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने 3, शिवसेनेने 2, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. या निवडणुकीत सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना भाजपा यांच्यात थेट लढत आहे.
हेही वाचा - Rajyasabha Election 2022 : राज्यसभेच्या निवडणुकासाठी मनसेची भाजपाला साथ