मुंबई - एनसीबीपेक्षा मुंबई अँटी नारकोटिक्स ब्युरोने केलेली वर्षभरातली कारवाई मोठी आहे. मात्र एनसीबीची कारवाई केवळ दिखाव्यापुरती असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एनसीबीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कार्डिया क्रूजवर अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईवर शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एनसीबीने अमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवायापेक्षा मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने केलेल्या कारवाया या मोठ्या आहेत. गेल्या वर्षभरात अँटी नार्कोटिक्स विभागाचा कामाचा आलेख पाहिला तर, तो आलेख एनसीबीच्या वर्षभराच्या आलेखापेक्षा कितीतरी मोठा आहे, हे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.
एनसीबीच्या पंचाची विश्वासार्हता काय ?
कार्डियाक क्रूजवर केलेल्या एनसीबीच्या कारवाईनंतर पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यासाठी ज्या पंचांची नावे समोर आली त्यापैकी एक नाव के. पी. गोसावी यांचे आहे. आता पंच म्हणून असलेले के. पी. गोसावी व्यक्ती कुठे आहेत, ते सापडत नाहीत. पंचनामा करण्यासाठी अशा पंचांची निवड करणाऱ्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या भूमिकेवरही शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.