मुंबई - राज्यसभा निवडणुकीत पुरेसे संख्याबळ असूनही महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवारांनी राज्यसभेत झालेल्या पराभवाबाबत नाराजी व्यक्त केली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत काळजी घेण्याच्या सूचनाही शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्या.
संजय राऊत यांच्याबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांची नाराजी - शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत देखील नाराजी व्यक्त केली. राज्यसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी नाव घेत थेट काही अपक्ष आमदारांवर नाराजी व्यक्त केली होती. अपक्ष आमदारांची मते फुटल्यामुळे महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार निवडून येऊ शकले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. आरोप केलेल्या आमदारांपैकी तीन आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार होते. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, शामसुंदर शिंदे, संजय मामा शिंदे यांची नावे संजय राऊत यांच्याकडून घेण्यात आली. अशाप्रकारे नाव घेतल्यामुळे बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी संजय राऊत यांच्या बाबत शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संजय राऊत यांच्या या भूमिकेचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
राज्यसभेत महाविकास आघाडीला मोठा झटका - नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असूनही शिवसेनेचा दुसरा आणि महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार पराभूत झाल्याने महाविकास आघाडीला हा मोठा झटका समजला जातो. या पराभवाबाबत चिंतन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवार यांनी पराभवाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच 20 जुलैला होणार्या विधान परिषद निवडणुकीमध्ये याची पुनरावृत्ती व्हायला नको. सर्वच नेत्यांनी याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना शरद पवार यांनी दिले आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी तयार रहाण्याच्या दिल्या सूचना - राष्ट्रपती निवडणुकीसाठी देखील सर्व नेत्यांनी तयार रहावे, यांनी सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीकडे अपक्ष आमदारांचे मत असताना देखील ती मते फुटली, यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीआधी सोबत असलेल्या अपक्ष आमदारांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आज सकाळी दहा वाजता शरद पवार यांनी आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवनिर्वाचित खासदार प्रफुल पटेल हे उपस्थित होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी लवकरच तिन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठकीबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.