मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्तीसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. सदर आरोपींच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीवरून शनिवारी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी एनसीबीने छापे मारले आहेत. हे छापे दक्षिण मुंबई, वर्सोवा, प्रवाह, चांदिवली सारख्या परिसरात मारण्यात आले आहेत. यादरम्यान एनसीबीने काही पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात एनसीबीकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, काही ड्रग्स पेडलरच्या संदर्भात तपास करत असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात येत आहे. रिया चक्रवर्तीची सलग ३ दिवस एनसीबीने चौकशी केल्यानंतर या संदर्भात रियाने काही ड्रग पेडलरची नावे घेतली होती. यात बॉलिवूडमधील काहीजणांची नावं रियाने घेतल्याची माहिती समोर येत आहे. या माहितीवरून सदर एनसीबीने छापेमारी केली असून, लवकरच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बोलीवूडमधील काही व्यक्तींना चौकशीसाठी समन्स पाठवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.