मुंबई - अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोकडून (एनसीबी) शनिवारी मुंबईच्या विविध भागांत छापे टाकण्यात आले. ड्रग विक्रेत्यांविरोधात चालवलेल्या मोहिमेच्या पर्श्वभूमीवर एनसीबीने वांद्रे, अंधेरी आणि पोवई भागांत छापे टाकले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तसेच शनिवारी रात्री उशिरा एनसीबीने पालघरमध्येही छापा टाकला. यात 1 कोटी रुपये किंमतीचे 505 ग्रॅम एमडी जप्त केले आहे.
हेही वाचा - नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे - फ्लेचर पटेल
काही विशिष्ट माहितींच्या आधारे एनसीबीच्या मुंबई प्रादेशिक युनिटच्या विविध पथकांद्वारे ही मोहीम सुरू असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.
दोन आठवड्यांपूर्वी क्रूझवर छापा
दोन आठवड्यांपूर्वी एनसीबीचे प्रादेशीक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वातील पथकाने कॉर्डेलिया या क्रूझ जहाजावर छापा टाकला होता आणि येथून कथितरित्या ड्रग जप्त केले होते. या प्रकरणात एनसीबीने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला देखील ताब्यात घेतले होते.
आर्यनचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला
क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर गुरुवारी (14 ऑक्टोबर) सुनावणी झाली. आर्यनची बाजू प्रसिद्ध वकील सतिश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी मांडली. मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल २० ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे, आर्यनचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांची चौकशी
एनसीबीने 9 ऑक्टोबरला सुमारे आठ तास चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांची चौकशी केली होती. 8 तासांच्या चौकशीनंतर ते एनसीबी कार्यालयातून बाहेर पडले. क्रूज ड्रग्स प्रकरणात एनसीबीने त्यांची चौकशी केली. याआधी एनसीबीने क्रूझ ड्रग्ज प्रकरणी इम्तियाज खत्री यांच्या मुंबईतील वांद्रे कार्यालयावर छापा टाकला होता. अचित कुमारच्या चौकशीत इम्तियाज खत्रींचे नाव पुढे आल्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली होती.
हेही वाचा - मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी.. प्रत्येक विकेन्डला सायन उड्डाणपूल राहणार बंद, एमएसआरडीसीचा निर्णय