मुंबई - मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांचा फोन टॅपिंग प्रकरणात ( Phone Tapping Case ) जबाब नोंदवून घेण्याकरीता मुंबई पोलीस सायबर सेलकडून ( Cyber Cell ) दाखल करण्यात आलेल्या अर्जाला आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टाने परवानगी दिली. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग करत गोपनीय अहवाल लिक केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. सायबर पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता मुंबई पोलिसांची सायबर सेल शाखा या प्रकरणी नवाब मलिकांचा जबाब नोंदवणार आहे. नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉंड्रिंग गैरव्यवहार प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र न्यायालयाच्या परवानगीने नवाब मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
700 पानी अहवाल - पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी 700 पानी अहवाल दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या या चार्जशीटमध्ये 20 शासकीय अधिकाऱ्यांसह शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये एका अंमलदाराचा समावेश असून तो अंमलदार 2019 मध्ये राज्य गुप्तचर विभागात कार्यरत होता. या अंमलदाराने आपल्या जबाबात सांगितलं आहे की, शिवसेना नेते खासदार संजय राऊत कोणाशी बोलतात यावर खास लक्ष देण्याचा आदेश होता. याचा रिपोर्ट हा वरिष्ठांना द्यावा लागायचा. फोन टॅपिंग करणाऱ्या या टीममध्ये दोन बड्या अधिकाऱ्यांसह 11 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे फोन टॅपिंग प्रकरण वैध आहे की अवैध हे माहित नव्हतं या अंमलदाराने सांगितलं आहे.
संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी 16 मार्च 2022 रोजी रश्मी शुल्का यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. तब्बल दोन तास त्या कुलाबा पोलीस ठाण्यात होत्या. रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणांमध्ये रश्मी शुक्ला यांचा मुंबई आणि पुणे पोलीस पोलिसांकडून देखील जवाब नोंदवण्यात आलेला आहे बेकायदेशीर कोण टायपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी शिवसेना नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देखील जवाब नोंदविला आहे. आता या प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांचा जबाब नोंदवून याकरिता सायबर सेलने सत्र न्यायालयाची परवानगी मागितली आहे न्यायालयाने परवानगी दिल्याने आता या प्रकरणांमध्ये यांचादेखील जबाब नोंदविण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण - राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केला होता. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयाच्या तक्रारीवरून रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून 2019 मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ अॅक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात देखील सर्वात प्रथम फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पीएस येथे गुन्हा दाखल आहे.