मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे हयातीत असतानाच युतीतून बाहेर पडण्याचा विचार शिवसेनेचा (Shivsena) होता. तसेच दहा वर्ष आधी शिवसेनेकडून राष्ट्रवादीला आघाडीचा प्रस्ताव (Shivsena Proposal to NCP) देण्यात आला होता. मात्र, त्यावेळेस राजकीय परिस्थिती पाहता तो प्रस्ताव मान्य झाला नाही, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी दिली आहे.
युतीमध्ये गेली 25 वर्ष शिवसेना सडली असे वक्तव्य पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यानंतर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मात्र, दहा वर्षांपूर्वीच युतीतून बाहेर पडण्याबाबत शिवसेनेचा विचार सुरू होता. भाजप हे शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा मतप्रवाह शिवसेनेत त्यावेळीपासून सुरू होता. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांनी मिळून राज्यात आघाडी करावी असा प्रस्ताव दहा वर्षाआधी शिवसेनेकडून आला होता. मात्र, त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो प्रस्ताव नाकारला असल्याचे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
- आघाडीत शिवसेनेची ताकद वाढली -
महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेची ताकद वाढली. भाजपसोबत असताना जेवढ्या जागा शिवसेनेच्या जिंकून आल्या होत्या त्यापेक्षाही अधिक जागा यावेळी शिवसेनेच्या जागा जिंकून आल्या असल्याचे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
- पंतप्रधानांबाबत वक्तव्य केले नसल्याचा नानांचा खुलासा -
भाजपकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. मात्र, कोणत्याही पदावर असलेल्या व्यक्तीबाबत बोलण्याअगोदर शब्दांची मर्यादा असणे गरजेचे आहे. पण आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कोणतेही वक्तव्य केले नसल्याचा खुलासा स्वतः नाना पटोले यांनी केला. त्यानंतर भाजपकडून करण्यात आलेला विरोध हा केवळ विषय भरकटवण्यासाठी केला जात आहे. भाजपकडे कोणताही विषय शिल्लक नसल्याने ते विरोध करत असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.
- थकित वीज बिलाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा-
ग्रामपंचायत, नगरपालिका यांच्या थकीत वीज बिलासाठी केंद्र सरकारकडून येणारे अनुदान थेट ऊर्जा विभागाला वळवण्यात यावे अशा प्रकारची चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली आहे. हा पैसा ऊर्जा विभागाला वर्ग करण्यात आला की नाही याबाबत अद्याप माहिती नसली तरी, ज्या खात्याचे वीज बिल थकीत झाले त्या खात्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी वीज बिल भरले पाहिजे. या खात्यांची वीज बिल शिल्लक आहेत. याबाबत गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. तसेच आघाडी सरकारमध्ये काँग्रेसबाबत कोणताही भेदभाव केला जात नाही. आतापर्यंत याबाबत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक किंवा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांना डावललं जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला नसल्याचेही यावेळी मलिक यांनी सांगितले. केवळ प्रसिद्धीसाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून प्रसारमाध्यमांसमोर अशी वक्तव्य केली जात असल्याचेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.
- पुढील सात दिवस शरद पवार यांचे कार्यक्रम रद्द -
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर चर्चा केली. त्यांनी केलेल्या फोननंतर शरद पवारांनी पंतप्रधानांचे आभार देखील मानले. तसेच पुढील सात दिवस शरद पवार यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले असून, सात दिवसानंतर शरद पवार यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर शरद पवार यांचे नियोजित कार्यक्रम केले जातील, अशी माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून दिली.