मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणामध्ये एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर दररोज नवनवीन आरोप करत आहेत. हे आरोप करताना ज्या पद्धतीची भाषा ते वापरत आहेत व ज्या प्रकारे त्यांना धमकावत आहेत, या प्रकरणाची तक्रार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
ज्या प्रकारची भाषा नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या संदर्भात वापरली आहे. त्यांना कामावरून काढण्यापासून तुरुंगात टाकण्यापर्यंत धमकी त्यांनी दिली होती. त्या संदर्भात ही तक्रार करण्यात आली आहे. एका सरकारी अधिकाऱ्यावर एक मंत्री पदाचा दुरुपयोग करून अशा पद्धतीने धमकी देत असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे असं सांगत राज्यपालांनी या संदर्भामध्ये उचित चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा. अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. वाटल्यास या प्रकरणाची तक्रार पंतप्रधानांपासून राष्ट्रपती महोदयापर्यंत करणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे.
नवाब मलिक यांची धमकी काय होती
मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात इशारा देताना वर्षभरात तुरुंगात टाकणार, असं खुलं आव्हान दिलं होत. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं वक्तव्य ही मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात केलं होत.
राज्यातील जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी समोर जनतेसमोर आणणार. त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा घणाघात मलिक यांनी केला होता.
हेही वाचा - आता हा दाढीवाला कोण? नवाब मलिकांचा नवा खुलासा; त्याचा शोध घेण्याचे एनसीबीला आवाहन