मुंबई - भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील तुळजापुरात राहो किंवा कोल्हापूरमध्ये, त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आमच्याकडे आहे, असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलं आहे. भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर आणि कोल्हापूरमध्ये निवडून येण्याचे आव्हान दिलं होतं. त्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
हिंमत असेल तर राजीनामा द्या
सतेज पाटील, मुश्रीफ यांचीही टीका -
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर सतेज पाटील यांनी टोला लगावला आहे. तुमचा कोल्हापूरात एकही आमदार नाही आणि तुम्ही कुणाला राजीनामा द्यायला लावता, 2019 मध्ये जेव्हा संधी होती, तेव्हा तुम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, आता ती संधी गेली आहे, अशी खोचक टीका सतेज पाटील यांनी केली आहे.
दादांना हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही -
विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष पूर्ण झालेले आहे, पुढील विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. त्यातच कोल्हापूरमध्ये भाजपाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे राजीनामा कोण देणार? कशासाठी?, असे सवाल करत हसन मुश्रीफ म्हणाले, कोणी राजीनामा देणार नाही, हे दादांना माहीत आहे. तसेच कोथरुडमधून आपण मेघा कुलकर्णींना डावलून निवडून आला आहात. अशावेळी भाजपाही तुम्हाला परवानगी कशी देईल? दोन्हीही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळे दादांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हाला तुमची येथेच गरज आहे, अशी कोपरखळी मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना दिली.
नेमके काय आहे प्रकरण -
बेळगाव सीमाप्रश्नावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी चंद्रकात पाटलांना लक्ष्य केले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणतात, चंद्र, सूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार, मात्र यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांची कोणतीही भूमिका नाही. यावर ते काहीही भाष्य करत नाहीत, अशी टीका उदय सामंत यांनी केली होती. तसेच, चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमध्ये कोणताच जनाधार नाही. आपण पराभूत होऊ, याची कल्पना असल्यानेच ते पुण्यातून निवडणुकीला उभे राहिले, अशी टीकाही त्यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर पुण्यामध्ये देत चंद्रकांत पाटलांनी निवडणूकीचे आव्हान दिले होते.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
आजपर्यंत कोणतीही निवडणूक हरलेलो नाही, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. कोल्हापूरमधून आजही निवडणूक लढवण्यास तयार आहे आणि तिथून निवडून आलो नाही, तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असे थेट आव्हान त्यांनी दिले होते. पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या प्रथम वर्षपूर्ती कार्य अहवालाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार कोथरूड येथून निवडणूक लढवण्याचे नक्की झाले होते, असे पाटील म्हणाले. त्यावेळी प्रदेशाध्यक्षपद असल्याने पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होईल, त्याचा फटका बसेल, असे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण निर्णय झाला होता. त्यामुळे मी पूर्ण तयारीनिशी उतरलो, असं पाटील यांनी सांगितलं. यावेळी पाटील यांनी कोथरूडमध्ये त्यांना पाडण्यासाठी कोण-कोण, कशा पद्धतीने प्रयत्न करत होते, याचा लेखाजोखा मांडला.