मुंबई - स्वतःमधील कलागुण ओळखून महिलांच्या मोजडीला वेगळे रूप देत उद्योजक मयुरी पुष्कर यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त ईटीव्ही ने 'नवरात्रीच्या नवदुर्गा' हा खास महिलांसाठी कार्यक्रम सुरू केला आहे. यामार्फत सामाजिक क्षेत्रात तसेच, अर्थ, उद्योग,इ. क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करत आहोत.
विविध रंगाच्या मोजडी आपण अनकेदा पाहिल्या आहेत. मात्र, विशेष मोजडी तयार करून त्यावर पैठणी आणि नथेची कलाकृती करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला मयुरी पुष्कर यांनी मोजडीच्या माध्यमातून समोर आणले आहे. 'कोयरी मयुरी' या नावाने मयुरी पुष्कर यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पैठणीचा वापर करत बनवलेल्या मोजडीला सध्या बाजारात मागणी आहे. यासोबतच नवरात्रीसाठी वेगवेगळ्या मोजडी देखील त्यांनी बनवल्या आहेत.
आई झाल्यानंतर ऑफिसला जाणे जमत नसल्याने काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले असे,पुष्कर म्हणाल्या.
एक जोडी मोजडीवर आर्ट वर्क करण्यासाठी पाच ते सहा तास लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पैठणी, कॉफी, मधुबनी अशा अनेक प्रकारच्या आर्टवर्क असणाऱ्या मोजडी तयार करतात.
यामधून त्यांना वर्षाला एक लाखाहून जास्त नफा होतो. भविष्यात त्यांना हा उद्योग जास्तीत जास्त पोहोचवायचा असून, यामधून महाराष्ट्राची संस्कृती जगासमोर आणायची आहे. परदेशातही या मोजडींना मोठी मागणी आहे, असे मयुरी यांनी सांगितले.