मुंबई - खासदार नवनीत राणा ( Navneet Rana Case ) आणि आमदार रवी राणा यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी लोकसभेच्या हक्कभंग समितीत या कारवाई विरोधात तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी या समितीने दखल घेतली असून, राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबईचे पोलीस महासंचालक यांना आता दिल्लीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार होते. त्यासाठी ते मुबंईत दाखल झाले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केली. जेलमधून बाहेर आल्यानंतर खार पोलीस ठाण्यात पोलिसांकडून जी वागणूक दिली गेली होती, त्याबद्दल त्यांनी संसदीय समितीकडे तक्रार केली होती. त्याप्रकरणी संसदीय समितीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव, मुंबईचे पोलीस आयुक्तांसह आणखी एका बड्या अधिकाऱ्याला 15 जूनला दिल्लीत हजर राहण्याचा आदेश दिला आहे. या सर्व बड्या अधिकाऱ्यांची आता दिल्लीत चौकशी होणार आहे.
कोण आहेत ते अधिकारी? - संसदीय समितीने चार अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि भायखळा कारागृहाचे अधिक्षक यशवंत भानुदास यांचा समावेश आहे.
हेही वाचा - SambhajiRaje Chhatrapati : पुरातत्व विभाग समिती हातून गेल्याची संभाजीराजेंना खंत?