नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना अरविंद सावंतांनी त्यांच्या देहबोलीवर टीका केली होती. या टीकेला आता नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "एक पुरुष मला शिकवणार का, की माझी देहबोली कशी असावी? मला ज्याप्रकारे माझं मत सभागृहात मांडायचंय त्याप्रकारे मांडण्याचा मला हक्क आहे" असे राणा म्हणाल्या.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बचे पडसाद सोमवारी (२२ मार्च) संसदेत पडसाद उमटले. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी ही या प्रकरणावर सेनेवर भाष्य केले. मात्र त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप केला. तसं पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे. खासदार राणा यांनी केलेल्या आरोपांचं सावंत यांनी खंडन केले आहे. हे सर्व आरोप चुकीचे आहेत. खासदार राणा यांचा शिवसेनेवर राग आहे म्हणून ते असे आरोप करत आहेत असे सावंत यांनी विडिओ प्रसारित करत सांगितले आहे.
राणा यांचे आरोप..
नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहीत शिवसेना खासदार यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. "तू महाराष्ट्रात कशी फिरते ते मी पाहतोच, तुलाही आम्ही तुरुंगात टाकू" अशी धमकी अरविंद सावंत यांनी आपल्याला दिल्याचे नवनीत यांनी या पत्रात म्हटले होते. सभागृहात सचिन वाझे यांच्या प्रकरणी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सावंत यांनी ही धमकी दिल्याचे त्या म्हणाल्या.
सावंतांचं स्पष्टीकरण..
सावंत यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. राणा या जेव्हा कधी भेटतात तेव्हा मला भैया, दादा असे म्हणतात. मी त्यांना कसलीही धमकी दिली नाही. मुळात मी शिवसैनिक आहे, त्यामुळे मी महिलांना धमकी देतच नाही. त्यांचा जर तसा आरोप असेल, तर त्यावेळी आजूबाजूला जे कोणी लोक असतील त्यांना तुम्ही विचारा असे सावंत म्हणाले. नवनीत राणा यांची बोलण्याची पद्धत आणि देहबोली ही पहिल्यापासूनच तिरस्करणीय आहे. मात्र, आम्ही कधीही त्यांना त्यावरुन काही बोललो नाही. मी त्यांना धमकावण्याचे काही कारणच नाही, असेही सावंत म्हणाले.
यावर नवनीत राणा यांनी सावंतांना फटकारले आहे. माझी देहबोली कशी असावी हे सावंत यांनी सांगण्याची गरज नाही, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा : सचिन वाझेची डायरी एनआयएच्या हाती; महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता