सिंधुदुर्ग - भाजप ईडीचा वापर करत नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारीत ईडी आणि सीबीआय आहे. पुरावे असल्याशिवाय ईडी आणि सीबीआय कोणाची चौकशी करत नाही, अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पाठविलेल्या नोटीसचे समर्थन केले आहे.
खासदार नारायण राणे म्हणाले की, पीएमसी बँकेत गैरव्यवहार केले आहेत. एक कोटीला घेतलेल्या मालमत्तेची आज अकरा ते बारा कोटी रुपये किंमत आहे. पीएमसी बँकेची चौकशी सुरू असताना हे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे ईडीने ही नोटीस दिली. ईडी असेच कुणालाही नोटीस देत नाही. त्यांना बीडी प्यायला लावतात, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
हेही वाचा-वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस : माझा अंदाज खरा ठरला - सचिन सावंत
काय आहे हे प्रकरण?
बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएएलच्या वाधवान बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात एचडीआयएएलची आर्थिक अनियमितता दिसून आली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलिसाची आर्थिक गुन्हे शाखा करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडीकडे गेले.
हेही वाचा-ईडीच्या नोटिसीसाठी माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय -संजय राऊत
वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये कर्जाच्या स्वरुपात मिळाले!
वाधवान बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचे नाव पुढे आले होते. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असे या शपथपत्रात नमूद आहे. त्यामुळे या 55 लाखांच्या माहितीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेबरला चौकशीसाठी बोलावले आहे.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट-
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने (सक्त वसुली संचनालय) नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान दोघांची ईडीच्या नोटिसीबाबत चर्चा झाल्याची माहिती शिवसेना सूत्रांकडून देण्यात आली आहे.
संबंधित बातमी वाचा-ईडी नोटीस'प्रकरणी राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट