मुंबई - भाजपा नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-शिवसेना हा संघर्ष काही नवा नाही. कोरोना, जनआशीर्वाद यात्रा, पूर किंवा राज्यातील इतर कोणतीही परिस्थिती असो, नारायण राणे नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना दिसले आहेत. वाचा नारायण राणेंची अशीच काही वादग्रस्त वक्तव्यं...
- ठाकरे सरकार पांढऱ्या पायाचे -
राज्यात संकट येत आहेत. त्याला कारण मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. ते आल्यापासून आपत्ती सुरुच आहे. वादळं काय, पाऊस काय, कोरोना काय, सगळं चालूच आहे. कोरोना ही त्यांची देण आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय बघायला पाहिजे, पांढऱ्या पायाचा, असे राणे म्हणाले होते. ते चिपळूण येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
- सीएम बीएम गेला उडत -
चिपळूणमधील पूरपरिस्थितीचा दौरा करण्यासाठी राणे गेले होते. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. 'तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा'
- घरात बसून मुख्यमंत्री पद चालवतात -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर राणेंनी टीका केली होती. ते म्हणाले होते, की 56 आमदारांवर बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं आहे. ते घरात बसून मुख्यमंत्री पद चालवतात. आता दोन दिवसांपूर्वी पिजऱ्यातून बाहेर पडत त्यांनी दौरा केला. स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणाला कानाखाली तरी दिली आहे का?
- मातोश्रीची सर्व आतली माहिती बाहेर काढू -
आमचा तोल गेला. तर आम्ही मातोश्रीची आतली आणि बाहेरची जी माहिती देऊ, ती महागात पडेल. बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून अजून संयमाने गप्प बसलो आहे. आमच्याकडे नजर फिरवू नका. आम्ही नजर फिरवली, तर कपडे सांभाळत पळता भुई थोडी होईल.
- बुद्धू मुख्यमंत्री -
मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून एकही काम यांनी नीट केलं नाही. यांना जीडीपी कळत नाही, अर्थव्यवस्था माहिती नाही. अधिकारी हसतात. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसला आहे. उद्धव ठाकरेंवर अधिकारी हसतात.
- मुख्यमंत्री अत्यंत पुळचट आणि शेळपट -
'दुसऱ्याच्या मदतीशिवाय उद्धव ठाकरे यांना काहीही करता येत नाही. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. वाघाची भाषा करणारा मुख्यमंत्री अत्यंत पुळचट आणि शेळपट माणूस आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्री केलं नसतं. हे खेळण्यातील मुख्यमंत्री आहेत. ते तरी दुसऱ्याच्या हाताने नाचतात, यांना नाचताही येत नाही. त्यांचं दसऱ्याचं भाषण महाराष्ट्राचं अधःपतन करणारं आहे.
- कोणत्याही विषयाचे ज्ञान नसलेला मुख्यमंत्री -
एक वर्षाचा निष्क्रिय आणि महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा कारभार या मुख्यमंत्र्यांचा आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला, म्हणून महाराष्ट्र पिछाडीकडे चाललाय.
- उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा सरपंच जास्त हुशार -
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शरद पवारांच्या कृपेमुळे बसले आहे. नाहीतर असा मुख्यमंत्री कोणी केला असता? या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आणि कायदे माहिती असलेला आहे.
हेही वाचा - नारायण राणेंना अटक करताना बंद खोलीत असा घडला हायहोल्टेज ड्रामा, पाहा VIDEO
हेही वाचा - सामना - मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणाऱ्याला कायदेशीर मार्गाने उखडलेलेच बरे
हेही वाचा - जामिनावर सुटताच नारायण राणे यांचं रात्रीच्या 12.32 वाजता फक्त दोन शब्दांचं ट्वीट!