मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा विरोध करीत आले आहेत. त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे गेल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole On Devendra Fadnavis About OBC Reservation ) यांनी केला आहे. तसेच संजय निरुपम यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे राज्य सरकार कोणालाही घाबरण्याचा प्रश्नच नाही असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
म्हणून ओबीसीचे आरक्षण गेले - देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार असताना २०१७ साली नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीवेळी फडणवीस यांनी ओबीसींचे रोश्टर क्लिअर करायचे म्हणून एक साधे परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. हे प्रकरण न्यायालयात गेले, त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेसह इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या. २०१८ साली उच्च न्यायालयाने सांगितले होते की, आयोग बसवा परंतु तत्कालीन फडणवीस सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही. म्हणून ओबीसींचे आरक्षण गेले.
मध्य प्रदेशाला केंद्राने मदत केली मात्र महाराष्ट्राला नाही - महाविकास आघाडी सरकार यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले. परंतु त्यासाठी आवश्यक असणारा ओबीसींचा डेटा देण्यास केंद्रातील मोदी सरकारनेही नकार देऊन महाराष्ट्र सरकारची कोंडी केली. मध्यप्रदेशमध्ये जेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मात्र केंद्रातील मोदी सरकराने त्या सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रात भाजपाविरोधी सरकार असल्याने केंद्राने मदत केली नाही.
अनेक प्रश्न केले उपस्थित - देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्ष ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहेत. दोन वर्षे काय केले असा प्रश्न विचारत आहेत. मग फडणवीस सरकारने पाच वर्षे काय केले? त्यांनी आयोग गठीत का केला नाही? इम्पिरिकल डेटामध्ये असंख्य चुका आहेत, असा दावा करणाऱ्या फडणवीसांनी मोदी सरकारकडे हा डेटा कशासाठी मागितला होता? आणि त्याच डेटाचा वापर मोदी सरकार सरकारी योजना राबवण्यासाठी का करत आहे? हे प्रश्न उपस्थित होतात, असेही पटोले म्हणाले.
ओबीसींच्या आरक्षणाचा मारेकरी भारतीय जनता पक्षच - मंडल आयोग लागू केल्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाला २७ टक्के आरक्षण लागू झाले. ह्या निर्णयाला देशभर भारतीय जनता पक्षानेच तीव्र विरोध केला होता. हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह जे भाजपा नेते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला दोष देत आहेत, त्यांनी आधी आपला इतिहास तपासून पहावा. ओबीसींच्या आरक्षणाचा मारेकरी भारतीय जनता पक्षच आहे, त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडून भाजपा आपल्या पापातून मुक्त होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
फोन टपिंग प्रकरणी जवाब - वरीष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा सांगण्यावरून करण्यात आलेल्या फोन टायपिंग प्रकरणी आज आपला जबाब नोंदवण्यात आल्याचे पटोले यांनी सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी आपल्याला ऐकून दाखवलेला आवाज आपलाच असल्याचे आपण सांगितले असून याबाबत फॉर्म तपासणी करून तो सिद्ध करावा असेही आपण म्हटले आहे. याबाबत लवकरच हे सर्व प्रकरण न्यायालयात सादर होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सरकार योग्य वेळी कारवाई करणार, निरूपमांचे मत वैयक्तिक - राज्य सरकार मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर कारवाई करायला घाबरत असल्याचे मत काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी व्यक्त केले आहे. याबाबत विचारले असता पटोले म्हणाले की, ते निरूपण यांचे वैयक्तिक मत आहे. मात्र राज्य सरकार या संदर्भात योग्य वेळी योग्य ती कारवाई करेल, कोणाला केव्हा अटक करायची याबाबत पोलीस विभाग त्यांच्या प्रोटोकॉल नुसार कारवाई करतील. मात्र कुणालाही घाबरण्याचा प्रश्न येत नाही असेही पटोले यांनी यावेळी सांगितले.