मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना सध्या राज्यामध्ये जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीवरून काँग्रेसच्या (Maharashtra Congress) गोटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. या अगोदरसुद्धा काँग्रेसने बरीच वर्ष राज्यात सरकार स्थापन करून त्याचा अनुभव घेतलेला आहे. पण विभिन्न टोकाचे, विचारधारेचे पक्ष एकत्र आल्यानंतर सध्या जी काही परिस्थिती काँग्रेस अनुभवत आहे त्या दृष्टीकोनातून येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीसाठी ही परिस्थिती काँग्रेसला घातक ठरू शकते. म्हणूनच काँग्रेसने आता आपल्या परीने जनतेच्या प्रश्नावर हालचाली करायला सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस अस्वस्थ? - सध्या राज्यात धार्मिक विषयावरून जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरून विशेषतः काँग्रेस पक्षात नाराजी आहे. वाढती महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विजेचा प्रश्न, इंधनाचे वाढते दर, वाढती बेरोजगारी यासारख्या विविध प्रश्नावर काँग्रेसने आतापर्यंत राज्यात विविध आंदोलने केली. विशेष करून वाढत्या महागाईच्या प्रश्नावर काँग्रेस केंद्र सरकारच्या विरोधात मागील चार महिन्यांपासून मुंबईभर आंदोलन करत आहे. परंतु सध्या राज्यात खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या हनुमान चालीसा पठण करण्यावरून, तसेच मशिदीवरील भोंगे यावरून जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून जनतेच्या हिताचे प्रश्न बाजूला लोटले गेले असल्याचा अंदाज काँग्रेस पक्षाला आला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आत्ताच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे जरी राज्याचा गाडा हाकत असले तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा पुरेपूर फायदा करून घेत आहे. अशी मनोधारणा काँग्रेस नाही तर शिवसेनेच्या आमदारांची सुद्धा झाली आहे. त्याबाबत या अगोदर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी दोन्ही पक्षांमध्ये दिसून आली. काँग्रेस आमदाराच्या शिष्टमंडळाने तर या संदर्भामध्ये काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेतली होती. राज्यात सध्या सत्तेचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात होत असून कॉंग्रेस या महाविकासआघाडीत घटक पक्ष असूनही ते यामध्ये फार मागे असल्याचे चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते तसेच आता कार्यकर्तेसुद्धा महाविकास आघाडीमध्ये त्यांची कोंडी होत असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस पक्ष घेणार जनतेच्या प्रश्नावर आढावा - याविषयी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेच्या प्रश्नासाठी लढत आलेला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून मागील ८ वर्षापासून अनेक प्रश्न राज्यात, देशात आ वासून उभे आहेत. परंतु सध्या ज्या पद्धतीचे धार्मिक राजकारण केले जात आहे ते पाहता इतर प्रश्नावर दुर्लक्ष होताना दिसत आहे. म्हणूनच जनतेच्या प्रश्नाकडे प्रामुख्याने लक्ष देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करत आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांनी काँग्रेस पक्षाच्या बैठकीतून राज्यातील आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. याबाबत दर मंगळवारी बैठक घेऊन त्याविषयी राज्यातील परिस्थिती जाणून घेऊन राज्यातील प्रश्नावर जनतेमध्ये कशा पद्धतीने जाता येईल व त्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी काय करता येईल याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात विजेचा प्रश्न गंभीर झालेला असताना हे खात काँग्रेसकडे असल्याकारणाने त्याच खापरही काँग्रेसवर फोडलं गेलं, त्याचं दुःखही काँग्रेस पक्षाला आहे. सरकार स्थापनेसाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्ष समाविष्ट तर झालेला आहे परंतु त्यांचं मानसिक समाधान झालेलं नाही हे नक्की.
काँग्रेसच्या अडचणीत वाढ? - काँग्रेसने या आधी देखील अनेक वर्ष फक्त सत्ता पहिली आहे. त्यामुळे तेव्हा काँग्रेसचे मंत्री असताना आमदारांची जनतेची कामे वेगाने होत होती, परंतु महाविकास आघाडीत आपली काम वेगाने होत नसल्याची तक्रार आमदार करत आहेत. महामंडळ आणि दंडाधिकारी यांच्या रखडलेल्या नियुक्त्या, जिल्हा समित्यांची निवडणूक, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक बऱ्याच गोष्टी बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्यानेही काँग्रेस नेत्यांत नाराजगी आहे. त्यातच पाच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना केल्यानंतर आधीच पक्षांतर्गत आव्हानांचा सामना करणाऱ्या काँग्रेस पक्षा समोर महाराष्ट्रात सत्ता असूनही आहे नवनव्या अडचणी उभ्या राहत असल्यामुळे कॉंग्रेसमध्ये अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.