मुंबई - नवी मुंबई येथील विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव राहणार आहे. त्या विमानतळाची जागा जरी पनवेल, नवी मुंबईत असली तरी ते विमानतळ मुंबईच्या नावानेच ओळखले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
- दोन आमदारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि अपक्ष आमदार महेश बालदी यांनी आज(21 जून) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नवी मुंबई येथे निर्माणाधीन असलेल्या विमानतळाला दिवंगत दि. बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला राज ठाकरे यांनी पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी या दोन आमदारांनी कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत. दि. बा. पाटील आणि बाळासाहेब ठाकरे या दोन्ही नावांच्या चर्चेवर पुर्णविराम देत. या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव देण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मुळात नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबई विमानतळाचे एक्सटेन्शन आहे. त्यामुळे या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावच असणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
- काय म्हणाले राज ठाकरे?
विमानतळ हे शहराच्या बाहेर असते. त्या अनुषंगानं मुंबईच्या बाहेर हे नवे विमानतळ बांधण्यात येत आहे. नवी मुंबईत हे विमानतळ बांधण्यात येत आहे. नवी मुंबईत बांधण्यात येणारे विमानतळ हे मुंबईतल्या विमानतळाचे एक्सटेन्शन आहे. त्यामुळे या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव असणार आहे. त्यामुळे जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येते तेथे इतर नावांची चर्चा होऊच शकत नाही, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा - अनिल देशमुखांसदर्भातील राज्य सरकारची ती याचिका फेटाळून लावा; अॅड पाटील यांची मागणी