मुंबई - महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील २२७ प्रभागातील जनतेला व सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी, प्रश्न, तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि मुंबईत काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 'माझी मुंबई, माझी काँग्रेस' हा १०० दिवसांचा कार्यक्रम मुंबईत राबविला जाणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी आज येथे केले.
पुढील वर्षभरातील कामाची रूपरेषा
मुंबई काँग्रेस कार्यालयातील राजीव गांधी भवन येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारी बद्दल व काँग्रेसच्या पुढील वर्षभरातील कामाची रूपरेषा व कामाचा आराखडा यावर चर्चा करण्याकरिता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेस कार्यकारिणीची आज पहिली बैठक झाली. या वेळेस एच. के. पाटील बोलत होते. या बैठकीला पाटील यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.
६ जिल्ह्यांमध्ये जनता दरबार
माझी मुंबई माझी काँग्रेस या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यावेळेस म्हणाले की, एकेकाळी मुंबईत निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या ७०-८० जागा निवडून यायच्या. कालांतराने त्या कमी-जास्त होऊ लागल्या. माझी मुंबई माझी काँग्रेस या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आम्हाला जाणून घेता येईल की, तळागाळातील काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कॉंग्रेसबद्दल काय वाटते, त्याला लढायचे आहे का? त्या विभागात त्याचा लोकसंग्रह किती आहे, त्या विभागातील लोकांना कॉंग्रेसबद्दल काय वाटते, याची आम्हाला माहिती मिळेल आणि त्याच्यासाठी एक पाऊल म्हणून आम्ही आमच्या ६ जिल्ह्यांमध्ये जनता दरबार घेणार आहोत.
आमच्याजवळ ज्या मंत्रालयांचे विभाग आहेत, त्याअंतर्गत येणारे प्रश्न, मच्छीमारांचे प्रश्न, बालकल्याण विकासाबाबतचे प्रश्न, शालेय शिक्षण विभागाबाबतचे प्रश्न, असे जनतेला भेडसावणारे अनेक प्रश्न जाणून घेऊन त्याबाबतचा एक अहवाल आम्ही महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील व वरिष्ठांना देऊ. आम्ही २२७ प्रभागांमध्ये निवडणूक लढविण्यास काँग्रेस का आग्रही आहे ते पटवून देऊ. तसेच आमचे अनेक कार्यकर्ते पूर्वी नाराज होऊन भाजपमध्ये गेलेले होते. त्यातील अनेक जण आता भाजपच्या एकधिकारशाहीला कंटाळले आहेत. ते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत व आमच्या संपर्कात आहेत. या १०० दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना पुन्हा काँग्रेसशी जोडून काँग्रेसला भविष्यकाळात मजबूत करण्याचा आमचा मानस आहे.