मुंबई - शरद पवार यांच्या मार्गदर्शनातून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्याकडे असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
काँग्रेसने आज (गुरुवार) इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राजभवनावर सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व नाना पटोले यांनी केले. त्यानंतर पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आंदोलनाची सुरुवात बारामतीमधून करत असल्याचेही एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. याबाबत त्यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता, बारामती हा केंद्रशासीत भाग नाही, त्यामुळे बारामतीतून आंदोलनाची सुरुवात करण्यात काही गैर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून पटोले आणि आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यात वाद असल्याची चर्चा होत आहे. शरद पवारांनी पटोले यांना छोटा माणूस संबोधत त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. त्यानंतर पवार पटोलेंच्या वक्तव्यांमुळे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर आज पटोलेंनी पवारांना आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल म्हटले आहे, त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त होत आहे.