मुंबई - गोवंडी, देवनार, मानखुर्द आणि शिवाजीनगर या परिसरांमध्ये तब्बल सात ते आठ लाखांहून अधिक मुस्लीम बांधवांची लोकसंख्या आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत या परिसरात कब्रस्तान अत्यंत अपुरे पडत आहे. यामुळे मुस्लीम समाजाला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्यात येणाऱ्या नवीन सरकारने आमच्या कब्रस्तानचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी येथील स्थानिक मुस्लीम बांधवांकडून केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध उपनगरातील अनेक प्रश्न समोर येत आहेत. यातच गोवंडी, शीवाजीनगर, देवनार आणि मानखुर्द परिसरातील मुस्लीम बांधवांनी आम्हाला बाकी काही नको, नवीन सरकारने आमचा इतका प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे.
देवनार, गोवंडी, शिवाजीनगर आणि जवळच असलेल्या मानखुर्द परिसरात सुमारे सात लाखांहून अधिक मुस्लीम बांधवांसाठी देवनार या परिसरात एकच कब्रस्तान आहे. ही जागा अत्यंत कमी आहे, याच्या बाजूलाच त्याच्या कब्रस्तानसाठी राखीव ठेवण्यात आली होती. ही जागा आरक्षित करण्यात आली होती, मात्र, मुंबईच्या विकास आराखड्यात ही कब्रस्तानची जागा एका विकासकाला देण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली असल्याचे स्थानिक कार्यकर्ते फिरोज सय्यद यांनी सांगितले. ही जागा आम्हाला मिळावी यासाठी स्थानिकांनी महापालिका प्रशासनाकडून इतर सर्व यंत्रणेकडे धाव घेतली आहे. मात्र, आपल्याला अजून न्याय मिळालेला नाही. राज्यात या विधानसभा निवडणुकीत येणाऱ्या सरकारने आमचा हा प्रश्न सोडवावा अशी मागणी फिरोज सय्यद यांनी केली आहे.
आम्हाला या ठिकाणी असलेल्या कमी जागेत अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवसाला किमान आठ ते नऊ जणांना येथे दफन केले जाते. मात्र, जागा कमी असल्याने अनेकदा प्रचंड अडचणी होत असतात. त्यामुळे सरकारने आम्हाला आमचा अधिकार मिळवून द्यावा, अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते मोहमद शेख यांनी केली.