मुंबई - मुलुंडमध्ये एका 67 वर्षीय वृद्ध महिलेची राहत्या घरात उशीने नाक, तोंड दाबून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. हत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
रुक्षमणी दामजी विसारिया असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मुलुंड पश्चिम येथील त्रिवेदी भवन इमारतीमध्ये राहत होत्या. याच इमारतीत पहिल्या मजल्यावर त्यांचा मोठा मुलगा मेहुल विसारिया देखील राहतो. रविवारी त्या पालिताना येथून परतल्या होत्या. त्यानंतर संध्याकाळी त्या मेहुलला भेटण्यास त्याच्या घरी गेल्या. यावेळी त्यांच्यात बातचीत झाली आणि त्या पुन्हा त्यांच्या घरात झोपण्यास गेल्या. याच विभागात त्यांचा दुसरा मुलगा नितीनचे एक दुकान आहे. त्याच्या दुकानातील एक महिला कर्मचारी कामानिमित्त सोमवारी दुपारी रुक्षमनी यांच्या घरी गेल्या.
दरम्यान, त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरामध्ये रुक्षमनी या निपचित पडलेल्या त्यांना दिसल्या. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केली असता शेजारी आणि काही नातेवाईक त्याठिकाणी आले. तेव्हा त्यांना रुक्षमनी यांची हत्या झाल्याचे समजले. परंतु या हत्येचा उद्देश आणि हत्या करणारा कोण? याचा तपास सध्या मुलुंड पोलीस करत आहेत.