मुंबई - दरवर्षी पावसाचे पाणी साचल्याने मुंबईची तुंबई होते. यासाठी पालिका दरवर्षी नालेसफाई करते. यावर्षी नालेसफाईच्या कामाला उशीर झाला आहे. त्यानंतरही संथगतीने नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेने नोटीस बजावली आहे. ७ दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईतील नालेसफाई - मुंबईत काही दिवसात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडल्याने पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे सखल भागात पाणी साचते. पाणी साचले की नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप केला जातो. यंदा पालिकेचा कार्यकाळ संपल्याने नालेसफाईच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली नव्हती. पालिकेत प्रशासक असलेल्या आयुक्तांनी उशिराने हे प्रस्ताव मंजूर केले. 15 मे पर्यंत 50 टक्के तर 31 मे पूर्वी 100 टक्के नालेसफाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
कंत्राटदाराला नोटीस - मुंबईत ११ एप्रिलपासून मुंबई शहर व उपनगरात नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली. नालेसफाईचे काम दोन शिफ्ट मध्ये करावेत अधिक मशीनचा वापर कर असेही आदेश आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले आहेत. मोठ्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी ७ कंत्राटदार व छोट्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी २४ वॉर्डात २४ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. नालेसफाईचे काम वेगाने सुरु असले तरी शहर भागातील वडाळ, वरळी, दादर माहिम, धारावी या भागातील नालेसफाई संथगतीने सुरु असल्याने कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.