मुंबई- शहरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. सरकारकडून केलेल्या घोषणांची पूर्तता होत नसल्यामुळे अखेर निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शैक्षणिक प्रक्रिया ठप्प आहे. त्यात फी माफी मिळत नाही, तसेच अकरा महिन्यांपासून वेतन थकीत आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे, अशी माहिती निवासी डॉक्टर संघटननेचे अध्यक्ष डॉ. अरुण घुले यांनी दिली.
या आंदोलनामध्ये डॉक्टरांनी रुग्णांची हेळसांड होणार नाही, याची काळजी घेतली आहे. डॉक्टर आपल्या सेवा पुरवत आहेत. तसेच त्यांनी सेवा पुरवत असताना हातामध्ये फलक धरून आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
११ महिन्यांपासून थकीत रक्कमही दिली नाही
मुंबईमध्ये महामारीच्या काळात अग्रस्थानी राहुन काम करणारऱ्या निवासी डॉक्टरांवर आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे, ही खुप मोठी शोकांतिका आहे. याच डॉक्टरांनी राबुन यशस्वी केलेल्या अनेक योजनांचे श्रेय लाटण्यासाठी शासन व प्रशासन नेहमी उतावळे होताना आपण पाहत आहोत. परंतु या आरोग्य सैनिकांच्या मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शैक्षणिक प्रक्रिया पूर्ण ठप्प असतानाही फी माफी तर दिलीच जात नाही, परंतु राज्य सरकारने मंजूर केलेली वेतनवाढीची ११ महिन्यांपासून थकीत रक्कमही दिली जात नाही.
बीएमसी प्रशासनाकडून मागच्या वर्षी उत्तेजनार्थ दिलेल्या रकमेलाच वेतनवाढ समजुन घ्या, असे आदेश देत आहे . म्हणून निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेला नाईलाजाने आंदोलन करावे लागत आहे . यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये याची खबरदारी पण आम्ही घेणार आहोत.