मुंबई - हिंसक कृत्य करण्याच्या आरोपाखाली विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला मुंबई पोलिसांनी अटक केली ( Hindustani Bhau Arrested ) होती. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला ( Hindustani Bhau Bail ) आहे. दरम्यान, आज हिंदुस्तानी भाऊची आर्थर रोड जेल मधून सुटका करण्यात ( Hindustani Bhau Released ) आली आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊला मोठा दिलासा मिळाला आहे.
दहावी - बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी 31 जानेवारीला राज्याच्या विविध शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केली. हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकवल्यामुळे ते रस्त्यावर आले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊला अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवारी त्याचा जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर 17 दिवसांनी हिंदुस्तानी भाऊची आर्थर रोड जेलमधून सुटका करण्यात आली आहे.
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक
जेलमधून बाहेर आल्यानंतर हिंदुस्तानी भाऊने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. तो म्हणाला की, मला न्यायालयावर विश्वास आहे. मी एका व्यक्तीला खूप मानायचो, मानतो आहे आणि मानत राहिल. ते आहेत स्वर्गीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. ते देखील लाखो लोकांचा आवाज होता. ते लोकांच्या हक्कासाठी खूप लढले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातही खूप साऱ्या अडचणी आल्या. ते त्याला सामोरे गेले, पण त्यांनी कधीही लोकांचा विश्वास तोडला नाही. ते शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या हक्कासाठी लढले. मी पण लोकांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहिल, असेही हिंदुस्तानी भाऊने म्हटलं आहे.