मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या २०१९ च्या उन्हाळी सत्राची तृतीय वर्ष बी.एस्सीची सत्र ६ ची परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होत आहे. ही परीक्षा दिनांक १० मे २०१९ पर्यंत चालणार आहे. या परीक्षेला ९ हजार ४१६ विद्यार्थीं बसणार आहेत. ही परीक्षा सात जिल्ह्यातील १२४ केंद्रावर तर दीव दमण येथील एका केंद्रावर पार पडणार आहे.
बी.एस्सीची परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परीक्षा विभाग सज्ज झाला आहे. मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यांत १२४ परीक्षा केंद्र आहेत. तर महाराष्ट्राबाहेर दादरा नगर हवेली येथे एक परीक्षा केंद्र आहे.
सुधारित अभ्यासक्रमानुसार परीक्षा-
२०१९-२०२० या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे .तसेच अभ्यासक्रमदेखील सुधारित करण्यात आलेला आहे. या सुधारित अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या तृतीय वर्ष बी.एस्सी सत्र ६ या परीक्षेमध्ये एकूण १५ विषय आहेत. परीक्षेचा कालावधी ३ तासांचा आहे. ही परीक्षा सकाळी साडदेहा वाजता सुरू होऊन दुपारी दीड वाजता संपणार आहे.
परीक्षार्थी मुलींची संख्या जास्त-
तृतीय वर्ष बी.एस्सी सत्र ६ च्या सुधारित अभ्यासक्रमात ९ हजार ४१६ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. त्यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. या परीक्षेमध्ये ५ हजार ५३७ विद्यार्थीनी आहेत. तर ३ हजार ७७९ हे विद्यार्थी आहेत. तसेच बी. एस्सी परीक्षेला सर्वात जास्त म्हणजे २ हजार ८३० विद्यार्थी ठाणे जिल्ह्यातून बसत आहेत. याच जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १ हजार ७३० मुली परीक्षेस बसत आहेत.
परीक्षा विभागाची तयारी सज्ज-
परीक्षा विभागातील हस्तलिखित विभाग, परीक्षा व निकाल विभाग, कँप विभाग व संगणक विभागातील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांची तयारी झाली आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी परीक्षा वेळेवर सुरू करण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले. परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य राहील, असा विश्वास डॉ. विनोद पाटील यांनी व्यक्त केला.
गतवर्षी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचे निकाल लागले होते उशीरा -
मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल उशीरा लागले होते. यामुळे विधि अभ्यासक्रमाची परीक्षा मुंबई विद्यापीठाला पुढे ढकलाव्या लागल्या होत्या.