मुंबई - बी.कॉम सत्र ५ व सीए परीक्षेची तारीख एकच असल्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी मुंबई विद्यापीठाने बी.कॉम सत्र ५ च्या ३० मे २०१९ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या वेळेत बदल केला आहे. ही परीक्षा दुपारी २:३० ते ५:३० ऐवजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० अशी होणार आहे.
बी.कॉम सत्र ५ ही परीक्षा पुनर्परीक्षार्थींसाठी आहे. ही परीक्षा २० मे पासून सुरू झालेली आहे. बी.कॉम सत्र ५ आणि सीए या दोन्ही परीक्षांची वेळ सारखी म्हणजे दुपारी आहे. यासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठास विनंती केली होती. विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना सीए परीक्षा देण्यासाठी विद्यापीठाने ३० मे २०१९ रोजी दुपारी २:३० ते ५:३० या वेळेत होणारे उपयोजित विषय आंतरप्रेन्युअरशीप अँड एमएसएसआय पेपर-१, ट्रेड युनियानीझम अँड इंडस्ट्रीयल रिलेशन्स पेपर-१ व एलीमेंट्स ऑफ ऑपरेशन्स रिसर्च पेपर-१ हे तीन पेपर दुपारच्या वेळेत होते. या तीनही पेपरच्या वेळा सकाळी १०:३० ते दुपारी १:३० अशा करण्यात आलेल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी व या परीक्षेसाठी दुपार ऐवजी सकाळच्या वेळेत जावे. या वेळेच्या बदलामुळे विद्यार्थी बी.कॉम सत्र ५ व सीए या दोन्ही परीक्षा देऊ शकतील. सदर परीक्षा ही उपयोजित विषयांची आहे. या तीनही पेपरला विविध केंद्रामधून १२५ ते १५० विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. या बदलाची सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आलेली आहे.